मैत्रिणीला उपचारासाठी घेऊन गेला, दवाखाना बंद असल्याचे पाहताच त्यानं बंदुकीतून झाडली गोळी; पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । मैत्रिणीच्या हाताला जखम झाल्याने तिला दवाखान्यात घेऊन गेलेल्या तरुणाने दवाखाना बंद असल्याचे पाहताच बंदुकीतून गोळी झाडली. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील कोडोली परिसरात रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेताजी बोकेफोडे उर्फ बंड्या (वय २३, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नेताजी बोकेफोडे हा त्याच्या मैत्रिणीच्या हाताला जखम झाल्याने तिला स्कूटीवर घेऊन कोडोलीतील समर्थनगरमध्ये असलेल्या गणेश क्लिनिक येथे गेला होता. मात्र, रविवारी क्लिनिकला सुट्टी असल्याने दवाखाना बंद होता. हे पाहून क्लिनिकच्या समोरच त्याने खिशातून पिस्तूल काढून जमिनीवर गोळी झाडली.

गोळीबाराच्या आवाजाने आजूबाजूचे लोक तेथे धावत आले. त्यानंतर तो मैत्रिणीला घेऊन तेथून निघून गेला. या प्रकाराची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या गोळीबारात कोणी जखमी झाले नसले तरी दिवसा गोळीबार झाल्याने पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे गतीने फिरवून तासाभरातच नेताजी बोकेफोडे याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून जर्मन बनावटीचे पिस्तूल पोलिसांनी जप्त केले. हे पिस्तूल त्याने कोणाकडून आणले होते. याचा पोलिस तपास करीत आहेत.