सातारा प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून कास परिसरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. दरम्यान, एका युवतीच्या दुचाकीला गव्याने धडक देत तिला खाली पाडून जखमी केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
ऋतिका अशोक बादापुरे (कय 19, रा. कासाणी, सध्या रा. जाधक उंबरी, ता. जावली) ही युवती बहिणीला आणण्यासाठी दुचाकीकरून अंधारी फाट्याकर गेली होती. तिला घेऊन घरी परतत असताना, अचानक चोरगे उंबरी गावच्या हद्दीतील मंदिरालगत तीन गवे रस्त्यावर आले. यातील एका गव्याने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीसह युवती खाली पडली.
दरम्यान, युवतीच्या हातासह पायाला दुखापत झाली असून, तिला पुढील उपचारासाठी कास पठार वन समितीच्या वाहनातून सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर साताऱ्यामधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच, वन्यजीव बामणोली विभागाचे वनक्षेत्रपाल व्ही. डी. बाटे, मुनावळे वनपाल संदीप पवार यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची विचारपूस केली. उपचारासंबंधी डॉक्टरांकडून माहिती घेत नातेकाइकांची भेट घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. वन विभागाने बादापुरे कुटुंबीयांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.