सातारा प्रतिनिधी । सध्या दिवाळी सणामुळे सुट्टी लागल्याने मुंबई- कामानिमित्त असणारे तरुण आपल्या गावी आलेले आहेत. गावी आल्यानंतर ते खरेदीसाठी बाहेर पडून खरेदीबरोबर मित्रांसोबत देखील फिरण्यास जात आहेत. मात्र, भरधाव वेगाने वाहने चालवण्याच्या भरात अपघाताच्या देखील घटना घडत आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील इंजबाव – म्हसवड या रस्त्यावर झालेल्या अपघातात एका तरुण जागीच ठार झाला आहे. बापूसाहेब तुकाराम कापसे (वय 28) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघाताची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात झाली आहे.
घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, इंजबाव येथील बापूसाहेब तुकाराम कापसे हा त्याच्या मालकीची गाडी घेऊन रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास म्हसवडकडे यायला निघाला होता. यावेळी महादेव मंदिरानजीक आल्यावर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी रस्त्यावरून पन्नास फूट निर्जन ठिकाणी पडली. यामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, गाडी चालवत असलेला बापूसाहेब कापसे हा जागीच ठार झाला.
बापूसाहेब मुंबई कुलाबा येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास होता. चार दिवसांपूर्वीच दिवाळीसाठी बापूसाहेब त्याच्या पत्नीसह इंजबाव या गावी आला होता. पत्नीला माहेरी सोडून तो इंजबाव गावी राहत होता. रात्री अकरा वाजता काही कामानिमित्त म्हसवडकडे येत असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटून गाडीचा अपघात झाला. त्यात तो जागीच ठार झाला. दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या अपघाताची फिर्याद बाळू बाबा कापसे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करीत आहेत.