खड्डा पाहण्यासाठी ‘तो’ खाली उतरला; अचानक मशीन सुरु होताच शरीराचे अक्षरशः झाले तुकडेच तुकडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळुरु राष्ट्रीय महामार्गालगत सर्व्हिस रस्त्यावर काम सुरू असताना एक भयानक घटना घडली. याठिकाणी काम करत खड्डा पाहण्यासाठी एक तरुण कामगार खाली उतरला असताना अचानक मशीन सुरु झाल्याने त्याच्या शरीराचे अक्षरश: तुकडेच -तुकडे झाले. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री खेड फाट्यावर घडली. करुणेश कुमार (वय २९, रा. अतीत, ता. सातारा, मूळ रा. खरचाैली महाराज गंज उत्तर प्रदेश) असे मशीनमध्ये सापडून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत खेड फाट्यावर गॅस पाइप टाकण्याचे काम सुरू असल्याने याठिकाणी काम करण्यासाठी रविवारी काही कामगार आले होते. या ठिकाणी इतर कामगारांसोबत करुणेश कुमार हा पोकलेन ऑपरेटर म्हणून त्या ठिकाणी कामाला आला होता. बोरिंग मशीनद्वारे खड्डा खणल्यानंतर तो खड्डा पाहण्यासाठी खाली उतरला होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन त्या खड्ड्यात तो पडला. मात्र, तो खड्ड्यात पडल्याचे कोणाला दिसले नाही. ज्या खड्ड्यात तो पडला होता. तो खड्डा पुन्हा आणखी खोल खणण्यासाठी बोरिंग मशीन सुरू करण्यात आली. त्यामुळे त्याच्या शरीराचे अक्षरश: तुकडे-तुकडे झाले. हा प्रकार रविवारी दुपारी घडला. मात्र, ही घटना त्याच रात्री उशिरा उघडकीस आली.

यानंतर कामगारांनी करुणेश कुमारच्या शरीराचा एक-एक तुकडा खड्ड्यातून बाहेर काढला. हा प्रकार नेमका कोणाच्या हलगर्जीपणामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. करुणेश कुमारच्या मृतदेहाचे तुकडे जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. करुणेशच्या मृत्यूची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेशहून त्याचे नातेवाइक साताऱ्यात पोहोचले. मात्र, नातेवाइकांनी अद्याप त्याचा मृतदेह ताब्यात घेतला नसून या घटनेला कोण जबाबदार आहे, याबाबत संबंधित कंपनी आणि नातेवाइकांमध्ये चर्चा सुरू आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार धनाजी यादव हे अधिक तपास करीत आहेत.