कृष्णा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये ‘नेटवर्क फर्माकॉलॉजी’वर कार्यशाळा उत्साहात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अधिविभागाच्यावतीने ‘नेटवर्क फर्माकॉलॉजी : अनफोल्डिंग मल्टिट्यूड ऑफ ड्रग टार्गेटस्’ या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. कार्यशाळेत महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा अशा विविध राज्यांतील सुमारे ८७ प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी नेहमीच संशोधनाला महत्व दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात साततत्याने विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण कार्यशाळा व चर्चासत्रे संपन्न होत असतात. ‘नेटवर्क फर्माकोलॉजी’ ही आजच्या वैज्ञानिक युगातील एक अत्यंत महत्त्वाची विद्या आहे. औषधांच्या प्रभावाचे सर्व संभाव्य परिणाम समजून देणारे तंत्रज्ञान अवगत करणे, हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. औषधनिर्माणशास्त्र विषयात उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा महत्वपूर्ण ठरणार आहे.

या दोनदिवसीय कार्यशाळेत छ. संभाजीनगर येथील डॉ. निखिलकुमार साखळे, मुंबईतील डॉ. श्वेता मोरे व बेळगाव येथील डॉ. संजय उगारे या तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समारोप सत्रात गोवा येथील शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शैलेंद्र गुरव यांनी मार्गदर्शन केले. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव यांनी प्रास्तविक केले. कार्यशाळेच्या संयोजिका प्रा. डॉ. अनुराधा चिवटे यांनी स्वागत केले. प्रा. ज्योत्स्ना गांधी यांनी सूत्रसंचालन केले. सहसंयोजिका प्रा. प्रतिक्षा जाधव यांनी आभार मानले.