सातारा प्रतिनिधी । माण तालुक्यातील टाकेवाडी येथे ट्रकमधून फरशी खाली घेत असताना फरशी कोसळल्याने त्या खाली अडकून एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. लाैहर प्रसाद मतन प्रसाद (वय ४२, रा. गाैरखास उरूबाबाजार, गोरखपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा. टाकेवाडी, ता. माण) असे मृत्यू झालेल्या परप्रांतीय कामगाराचे नाव आहे.
याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, टाकेवाडी येथील एका दुकानासमोर ट्रकमधून फरशी खाली उतरण्याचे काम सुरू होते. लाैहर प्रसाद हे एक-एक फरशी डोक्यावर घेऊन खाली उतरत होते. त्यावेळी अचानक फरशींचा ढीग खाली कोसळला. यात प्रसाद अडकले. त्यांच्या डोक्याला, हाता पायाला गंभीर जखम झाली.
काही कामगारांनी त्यांना फरशीखालून बाहेर काढले. त्यानंतर तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अशोककुमार चाैरासिया (वय ३०, रा. उत्तरप्रदेश) याने दहिवडी पोलिस ठाण्यात याबाबत खबर दिली आहे. पोलिस नाईक आर. पी. खाडे हे अधिक तपास करीत आहेत.