सातारा रेल्वेस्थानकात इमारतीचा लॉप्ट कोसळून कामगाराचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा रेल्वेस्थानकात बांधकाम सुरू असलेल्या पार्सल विभागाच्या इमारतीचा लॉप्ट कोसळून परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. अच्छेलाल अमीरे कोल (वय २३, रा. सिध, मध्य प्रदेश) असे मृत कामगाराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा रेल्वेस्थानकात पार्सल कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या दरवाजावर ५ फूट लांब ३ फूट रुंद तसेच चार इंच जाडीचा अंदाजे २०० किलो वजनाचा सिमेंटचा लॉप्ट बसविला होता. त्याचे प्लायवूड काढताना हे लॉप्ट अछ्छेलालच्या अंगावर कोसळला.

रेल्वेस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम घेतलेले मुख्य ठेकेदार कंपनी मुंबईस्थित असून, त्या कंपनीने दुसरा ठेकेदार नेमला आहे. त्या ठेकेदाराने तिसऱ्या ठेकेदाराला लेबर वर्कवर काम दिले आहे. सध्या हे काम थर्ड पार्टी ठेकेदार करत आहे. याची चौकशी व्हावी, मृत कामगाराच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत द्यावी, सर्व कामगारांचा अपघाती विमा उतरवण्यात यावा. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सातारा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष व सातारा रेल्वे स्टेशनचे सल्लागार समितीचे माजी सदस्य विकास कदम यांनी केली आहे.

पंधरा दिवसांपूर्वीही याच इमारतीच्या बांधकामावरील लॉष्ट कोसळून एक कामगार जखमी झाला होता. त्याचे हातपाय फॅक्चर झाले. दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेचा अधिक पोलिसांकडून केला जात आहे.