नातेवाईकाच्या घरातून 6 तोळ्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक, मुद्देमाल हस्तगत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । नातेवाईकाच्या घरातील सहा तोळ्याचे सोन्याचे तसेच चांदीचे दागिने चोरून पळून गेलेल्या महिलेस सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने कळंबे (ता. सातारा) येथे अटक केली आहे. तिच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दीपाली संतोष बोराटे (रा. वडुथ, ता. सातारा) यांनी दि. २१ जून रोजी घरातून त्यांचे 6 तोळे सोने व चांदीचे दागिने चोरीला गेल्याची फिर्याद सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. तसेच पाहुणी म्हणून आलेल्या महिलेवर संशय व्यक्त केला होता. चोरीच्या घटनेपासून संशयित महिलेचा पोलीस शोध घेत होते.

पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल, डीवायएसपी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी संशयित महिलेला ताब्यात घेण्याची सूचना दिली होती. त्यानुसार डी. बी. पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे कळंबे (ता. जि. सातारा) येथून संशयित महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे कसून चौकशी केली असता नातेवाईकांच्या घरातून सोने व चांदीचे दागिने चोरल्याची कबुली दिली.

पोलिसांनी तिच्याकडुन 6 तोळे सोने व चांदिचे दागिने हस्तगत करून चोरीच्या गुन्ह्यात तिला अटक केली आहे. उपनिरीक्षक एस. के. शिंदे हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक एस. के. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, हवालदार राजू शिखरे, मालोजी चव्हाण, पोलीस नाईक किरण जगताप, कॉ. शिवाजी डफळे, संदिप पांडव, होमगार्ड विवेक शेडगे, विठृठल सावंत यांनी ही कारवाई केली.