सातारा प्रतिनिधी । गुरांना चारा घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना माण तालुक्यात घडली आली आहे. माण तालुक्यातील पानवण या गावात चौघांनी महिलेला उसाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिचा विनयभंग केला आहे. जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा म्हसवड पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी देवदास नरळे, पिंटू नरळे या दोघांना अटक केली आहे. तर संतोष नरळे, जनाप्पा शिंदे हे दोघे पळून गेले आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिला म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून घटनेतील फरार संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, २५/०८/२०२३ रोजी देवदास महादेव तुपे व त्याची आई श्रीमती शहिदा महादेव तुपे हे घरासमोर बसले असतांना आरोपी देवदास रोहिदास नरळे यांस जनावराचे चाराकरीता २००० रुपये दिले होते त्याचा चारा दिला नाही, तरी माझे पैसे परत दे असं म्हणाले. यानंतर आरोपी देवदास रोहिदा नरळे यांनी शिवीगाळ करुन मी तुझे पैसे देणार नाही तुला काय करायचे ते कर असे म्हणुन दमदाटी केली होती. त्यानंतर २६/०८/२०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता गांवातील प्रतिष्ठीत व्यक्तींसह महालक्ष्मी खताच्या दुकानाच्या समोर लोक जमले असतांना आरोपी देवदास रोहिदास नरळे, पिंटू ऊर्फ शांताराम रोहिदास नरळे, संतोष गोपाळ शिंदे, जनाप्पा विठ्ठल शिंदे यांनी संगणमताने श्रीमती शहादा महादेव तुपे यांना मारहाण करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे.
याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाणे गुरनं २७२/२०२३ भादंविस कलम ३५४,३२४,३२३,५०४,५०६,३४ अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३ (१) (आर) (एस).३ (२)(व्हीए) ६ प्रमाणे दिनांक २६/०८/२०२३ रोजी २१.५५ वाजता दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपी देवदास रोहिदास नरळे, पिंटु ऊर्फ शांताराम रोहिदास नरळे यांना दिनांक २७/०८/२०२३ रोजी १.१६ वाजता अटक करण्यात आली आहे. तसेच या गुन्हयातील फरारी आरोपींच्या शोधाकरीता म्हसवड पोलीस ठाण्यातील दोन पथक तयार करुन रवाना करण्यात आली आहेत.