विहिरीचा भाग कोसळून कामगाराचा जागीच मृत्यू, तीन कामगार बचावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | उत्तरमांड नदीच्या काठावर विहिरीची सिमेंट रिंग जिरवण्याचे काम सुरू असताना एका बाजूची पडदी अचानक कोसळून ढिगाऱ्याखाली गाढले गेलेल्या चार कामगारातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित तीन कामगार बचावले असल्याची घटना मंगळवारी घडली. कराड तालुक्यातील भवानवाडी येथे घडलेल्या घटनेमुळ हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील भवानवाडीत संदीप काकासो पवार यांच्या विहिरीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. मंगळवारी नेहमीप्रमाणे सिमेंट रिंग जिरवण्याचे काम सुरू होते. चारजण दुपारचे जेवण करून विहिरीत कामासाठी उतरले. यावेळी काम सुरू असताना हा अपघात झाला.

घटना घडताच भवानवाडी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन जेसीबी यंत्राच्या मदतीने ढिगाऱ्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे हेही पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्यात सामील झाले. परंतु, पाऊस सुरू झाल्यामुळे मदत कार्यात विघ्न आले. भरपावसात चिखल उपसून त्या कामगारांचे सिमेंट पडदी व स्टीलमध्ये अडकलेले पाय सोडवण्याचे काम सुरूच ठेवण्यात आले होते. त्यामुळे तीन कामगारांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यास यश आले. यावेळी जखमी अवस्थेतील कामगारांना रुग्णवाहिकेच्या मदतीने उंंब्रज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

एक कामगार पूर्ण गाढला गेला असल्यामुळे त्याचा मृतदेहच बाहेर काढण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. घटनास्थळी भवानवाडी, अंधारवाडी, पठारवाडी येथील ग्रामस्थ, तसेच युवक मदतीसाठी मोठ्या संख्येने दाखल झाले होते.

घटनास्थळावरील अधिक माहिती अशी की, अचानक सिमेंट कॉंक्रीटची पडदी आजूबाजूच्या मातीसह विहिरीत कोसळली. यामुळे विहिरीत काम करणारे चार कामगार मातीसह सिमेंट कॉंक्रीटच्या पडदीत गाढले गेले. यातील दिलीप जाधव-पाटील हे पूर्णपणे गाढले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर इतर तीन कामगारांचे छातीपर्यंतचेच शरीर मातीत आडकले. त्यामुळे ते दैवबलवत्तर म्हणूनच बचावले. त्यांचे पाय बांधकामाच्या स्टीलमध्ये अडकलेले असल्यामुळे त्यांना बाहेर काढणे मुश्किल बनले होते.

तरीही अत्याधुनिक मशिन्स व ग्रामस्थांच्या मदतीने साडेचार वाजण्याच्या सुमारास एका कामगारास विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असताना अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने मदतकार्य थांबवणे भाग पडले. पाऊस थांबल्यानंतर इतर दोन कामगारांना विहिरीच्या खड्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. चौथा कामगार मात्र गाळात व पडलेल्या सिमेंट कॉंक्रीटच्या बांधकामात गाढला गेल्याने तो जागीच मृत्युमुखी पडला. त्याचा मृतदेह गाळ बाजूला काढून बाहेर काढण्यात आला.