सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात सुशोभीकरण करण्याच्या उद्देश्याने पालिकेकरून अनेक कामे हाती घेण्यात आलेली आहेत. सातारा पालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस चौक परिसरात आयलँड विकसित केले जात असून, या ठिकाणी एकात्मिक सेना मुख्यालयाच्या वतीने शौर्यवाहन म्हणून ‘टी ५५’ रणगाडा ठेवला जाणार आहे. हे काम प्रगतिपथावर असून, लवकरच हा रणगाडा राजधानीत दाखल होणार आहे.
देशसंरक्षणार्थ शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती तेवत ठेवण्यासाठी पालिकेकडून नेताजी सुभाषचंद्र बोस चौक परिसरात शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती स्मारक विकसित करण्यात आले आहे. याच चौकामध्ये सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून भारतीय सैन्याकडे असलेला ‘टी-५५’ हा रणगाडा ठेवला जाणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा रणगाडा सीएएफडी खडकी येथून सातारा पालिकेला सुपूर्द केला जाणार आहे.
मुख्याधिकारी अभिजित बापट, दिलीप चिद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रणगाडा उभारण्यासाठी भक्कम पाया तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. हे काम पूर्णत्वास येताच पालिकेकडून रणगाडा आणला जाणार आहे. या रणगाड्याची दैनंदिन देखभाल पालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. रणगाड्यामुळे राजधानीच्या लौकिकात भर पडणार असून, हा रणगाडा तसेच कर्नल संतोष महाडिक स्मृती स्मारक देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.