ऊसाच्या फडातलं बिबट्याचं पिल्लू म्हणून वन विभागाने घेतलं ताब्यात, ते निघालं…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील सुपने गावात आज सकाळी ऊसतोड सुरू असताना मजुरांना एक पिल्लू आढळून आलं. पिल्लाच्या शरीरावर ठिपके पाहून ऊसतोड मजूर हबकले. त्यांनी ताबडतोब शेत मालक धनाजी पाटील यांना बोलावून घेतले. त्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली. वन कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन ते पिल्लू ताब्यात घेतलं. मात्र, ते पिल्लू बिबट्याचं नसून वाघाटीचं असल्याचं स्पष्ट झालं.

सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे. ऊसतोडीमुळे शिवारं रिकामी होत आहेत. नदीकाठची ऊसशेती ही अलिकडच्या काळात बिबट्याचं आश्रयस्थान बनली आहे. त्यामुळे ऊसतोडीच्या हंगामात शेतामध्ये बिबट्याची पिल्ले आढळून येतात. बिबट्यासारखेच शरीरावर ठिपके असणारा प्राणी म्हणजे वाघाटी. त्याला रान मांजर असं म्हटलं जातं. वाघाटीला लोक फसून बिबट्या समजतात.

वाघाटी हे घरगुती मांजराच्या आकाराचे रानमांजर आहे. याचा रंग व अंगावरिल ठिपके हे बिबट्याप्रमाणेच असतात व बिबट्याची हुबेहुब लहान प्रतिकृती हे मांजर दिसते. याचा वावर भारतातील पूर्वेकडील राज्ये, ब्रम्हदेश, थायलंड, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा इत्यादी देशात आहे. कर्नाटक व केरळमधील सह्याद्रीच्या रांगात याचीच उपजात आढळून येते. या मांजराला दाट ते घनदाट प्रकारची जंगले पसंत असून मानवी वस्तीच्या जवळ याचा वावर असतो.