सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीसाठी दुपारपर्यंत चुरशीची मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असताना जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. मतदान करतानाच एका मतदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. जिल्ह्यातील खंडाळ्यातील मोरवे गावात ही घटना घडलीघडली असून शाम धायगुडे (वय 67) वर्षे असे म्रुत्यु झालेल्या मतदाराचे नाव आहे.
वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर असा मिळून वाई विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांचा मतदानासाठी चांगला प्रतिसाद असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तरुणांसह महिला वयोवृद्ध नागरिक देखील मोठ्या संख्येनं मतदानाचा हक्क बजावत आहे. मात्र, खंडाळा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळं सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त केलं जात आहे.
मृत धायगुडे हे मुंबई येथे सनदी लेखापाल (चार्टड अकौंटंट) होते. परंतू काही वर्षांपूर्वीच ते आपल्या मूळ गावी म्हणजेच मोरवे, ता. खंडाळा येथे स्थायिक झाले होते. मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोग आवाहन करीत असते. शहरातील उच्चभ्रू व उच्चविद्याविभूषित लोकही मतदानादिवशी मतदानाकडे पाठ फिरवून पर्यटनास निघून जातात. परंतू व्यवसायाने सनदी लेखापाल असलेले व गावाकडे येवून शेती करीत आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य जगत असलेल्या धायगुडेंना मतदानाचा हक्क बजावतानाच त्यांचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
दरम्यान, दुपारी तीन वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघात मतदान झाले. २५५ फलटण : 48.41, २५६ वाई : 48.19, २५७ कोरेगाव : 53.71, २५८ माण : 45.01, २५९ कराड उत्तर : 52.03, २६० कराड दक्षिण : 52.56, २६१ पाटण : 51.59, २६२ सातारा : 47.96 टक्के मतदान झाले.