सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यातील बोपर्डी गावात जिल्हा परिषद शाळेच्या वतीने शनिवारी सकाळी ८ वाजता बाल बाजार भरवण्यात आला. यावेळी पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी भाजीपाल्यासह अनेक खाद्य पदार्थांची विक्री करत व्यवहार ज्ञानाचे धडे गिरवले.
गावच्या चावडीच्या मैदानावर भाजीपाला ,कडधान्ये, फळे, मसाल्याचे पदार्थ, सौंदर्यप्रसाधने, खाद्य पदार्थ, शैक्षणिक साहित्य आदींचे स्टॉल्स विद्यार्थ्यांनी लावले होते. सकाळी ८ वाजता गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते भाजी मंडईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थांनी देखील बाल बाजारास उपस्थिती लावून विविध भाजी तसेच वस्तू, खाद्य पदार्थांची खरेदी केली.
सुमारे अडीच तास भाजी मंडई गर्दीने फुलून गेली होती. ग्रामस्थांनाही ताजा भाजीपाला व फळे मिळाली. विशेष म्हणजे भाजीमंडई कमिटीची स्थापना करण्यापासून ते विक्रेत्यांची बैठक व्यवस्था ,परिसर स्वच्छता इत्यादी कामांचे सर्व नियोजन विद्यार्थ्यांनीच केले होते. विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानाला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी तोंड भरुन कौतुक केले. बोपर्डी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व पालक या सर्वांनी भाजीमंडई ला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.