सातारा प्रतिनिधी | सातारा दौऱ्यावर आलेल्या युनेस्कोच्या पथकाकडून शुक्रवारी सकाळी किल्ले प्रतापगडाला भेट देण्यात आली. या भेटीवेळी पथकाने किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंची पाहणी करून त्यांची माहिती जाणून घेतली. किल्ल्याची तटबंदी व अन्य वास्तू दीर्घ काळापासून सुस्थितीत असल्याचे पाहून पथकाने किल्ल्याची जपणूक करणाऱ्या सेवेकऱ्यांचे कौतुकही केले.
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील अकरा व तामिळनाडूमधील जिंजी किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करावा, असा प्रस्ताव युनेस्कोला पाठवला आहे. या यादीत सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे. गेल्या साडेतीन वर्षापासून हा किल्ला दिमाखात उभा आहे. या किल्ल्याची युनेस्कोच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली. पुणे जिल्ह्याचा दौरा आटोपून हे पथक शुक्रवारी सकाळी नऊ वाजता प्रतापगडावर दाखल झाले.
पथकाकडून किल्ल्यावरील स्वच्छता व्यवस्थापन, मुख्य दरवाजा, चोर वाटा, तटबंदी, बुरुज तसेच सुशोभीकरणाची कामे आदींची पाहणी करून त्यांचे माहिती जाणून घेण्यात आली. यानंतर या पथकाने किल्ल्यावरील सेवेकार्यांशी संवाद साधताना उपस्थित तरुणांना काही प्रश्नही विचारले.
येथील तरुणांना उत्पन्नाचे कोणतेही शाश्वत साधन नाही की कसण्यासाठी शेती. प्रतापगडाला भेट देणाऱ्या पर्यटकांवरच त्यांची रोजी-रोटी चालते. या किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश झाल्यास छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची जगाला नव्याने ओळख होईल. किल्ल्यावर पर्यटन वाढेल, रोजगाराच्या संधी वाढतील, त्यामुळे किल्ल्याचा जागतिक वारसास्थळ यादीत समावेश करावा, अशी मागणी तरुणांनी युनेस्कोकडे केली. या पथकाकडून अफजल खान कबर व परिसराची पाहणी देखील करण्यात आली. यानंतर हे पथक साताऱ्याकडे रवाना झाले.
पथकाने छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट देऊन येथील बारा किल्ल्यांच्या प्रतिकृतीची पाहणी केली. वाघनखांच्या दालनालाही या पथकाने भेट देऊन येथील कामकाज व व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी किल्याचे प्रशासकीय कामकाज, तसेच जिल्हा नियोजन समिती, जिल्हा वन अधिकारी आणि पुरातत्त्वविभाग यांच्या पुरातत्व शास्त्रीय दृष्ट्या कामकाज पहिले जाते, अशी माहिती युनेस्को पथकला दिली.