खंबाटकी घाटात ट्रकने घेतला पेट; आगीत ट्रकचे मोठे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पुणे – सातारा मार्गावर खंडाळा हद्दीत शनिवारी रात्री बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. मालट्रकच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याने या घटनेत ट्रक जळून खाक झाला. त्यामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले. ट्रकने पेट घेतल्यानंतर महामार्गावर आगीचे लोळ उठत होते. आणि धुराचे लोट पसरले होते.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे – सातारा मार्गावरून शनिवारी रात्री एक ट्रक निघाला होता. ट्रक खंडाळा गावच्या हद्दीत आला असता. ट्रकने अचानक पेट घेतला. यावेळी ट्रकमधील चालकाने खाली उतरून ट्रकला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलीस, शिरवळ रेस्क्यू टीम आणि एशियन पेंटस् कंपनीची अग्निशामक गाडी पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याच्या सहाय्याने ट्रकला लागलेली आग विझवण्यास सुरुवात केली. दोन ते तीन तासानंतर आग विझवण्यात त्यांना यश आले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही.

ट्रकला रात्रीच्या वेळी लागलेल्या अचानक आगीमुळे पुणे – सातारा लेनवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. त्यामुळे या लेनवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आग विझवण्यात आल्यानंतर खंडाळा पोलिसांनी लेनवर थांबलेली वाहतूक पुन्हा सुरळीत केली.