गणेश भक्तांवर वाहतूक कोंडीचे ‘विघ्न’; कात्रजसह खंबाटकी घाटात 3 तासांपासून ट्रॅफिक जाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | विकेंड तसेच शनिवार – रविवारी दोन्ही दिवशी लागून आलेल्या सुट्टीमुळे व गणेशोत्सवामुळे गणेशभक्त तसेच चाकरमानी मोठ्या संख्येने पुणे-मुंबईहून गावी निघाले आहेत. मात्र, कात्रज घाट, खंबाटकी घाट या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून पुणे-सातारा मार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. सध्या खंबाटकी आणि कात्रज घाटात 3 तासांपासून मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सुट्टी असल्यामुळे मुंबई आणि पुणे येथील पर्यटक महाबळेश्वर, कास, पाचगणी या ठिकाणी भेटी देण्यासाठी तर गणेशभक्त आपापल्या गावी गणेशोत्सवासाठी दाखल होऊ लागले आहेत. खंबाटकी घाटमाथ्यावर सहाव्या वळणावर असणाऱ्या दत्त मंदिराच्या ठिकाणी 3 लेनचा घाट 2 लेनचा झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार ट्राफिक जाम होत असते.

परिणामी अशात या ठिकाणाहून जाणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त असल्यामुळं सकाळपासून वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. सध्या वाहतूक पोलिसांकडून घाटात निर्माण झालेली
वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वाहतूक कोंडीचे विघ्न

वाहनांची वाढलेली संख्या आणि महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामामुळे वाहनांचा वेग मंदावला आहे. त्यातच प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने गणेश भक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी मध्यरात्री पासूनच पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. अजुनही पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटलेली नाही.

वाहतूक कोंडीने वाहनधारक त्रस्त

कात्रज जुना घाट आणि खंबाटकी बोगदा परिसरात ट्रॅफिक जाम आहे. कासव गतीने वाहने पुढे सरकत आहेत. सातारा-पुणे येण्या-जाण्याच्या प्रवासाला तीन तासाहून अधिक वेळ लागत आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.