सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या केट्स पॉईंटवरून गुजरात येथील पर्यटकाने बुधवारी रात्री सातच्या सुमारास सुमारे अडीचशे फूट दरीत उडी मारून आत्महत्या केली. काल गुरुवारी दुपारी मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेहाशेजारी सापडलेल्या आधार कार्डवर अनिल अग्रवाल (वय ६६, रा. आत्माराम अग्रवाल सी/८०१, एकता अनुवऐ बी/एच एकता टॉवर वसना बर्रागे रोहद वसना अहमदाबाद, पालडी, गुजरात) असा उल्लेख आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केटस पॉईंट, महाबळेश्वर येथील निडल होल येथील कड्यावरून बुधवार, दि. २४ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एका अनोळखी पुरूषाने उंचीवरून उडी मारून आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली. मात्र रात्री अंधार पडलेला असल्यामुळे महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी गुरुवारी सकाळी कड्यात उतरण्याचा निर्णय घेतला. सकाळी महाबळेश्वर ट्रेकर्सला एक मृतदेह आढळून आला.
मृत्यू प्रकरणातील अनोळखी मृतदेहाची व त्याच्या नातेवाईकांची शोध मोहीम पाचगणी पोलिस ठाण्यातून सुरू आहे. आत्महत्या केलेल्याचे वय अंदाजे ६६ असून अर्धवट टक्कल असून पांढरे केस आहेत. अंगात निळ्या रंगाची जिन्स पँट, उजव्या हातात लाल रंगाचा धागा आहे. तरी अशा वर्णनाच्या इसमाबाबत काही उपयुक्त माहिती असल्यास पाचगणी पोलिस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नीलेश माने तपास करीत आहेत.