सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने ट्रॅक्टरची लोखंडी फनपाळी चोरणारा चोरटा 24 तासांचे आत जेरबंद करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टर असा एकुण 7 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे.
धनराज शरद जगदाळे (वय – 20, रा. नांदगाव, ता. जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख व अप्पर अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी घरफोडी, चोरी असे गुन्हे उघडकीस आणुन चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करुन गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या सुचना उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले यांना दिलेल्या. त्या अनुषंगाने त्यांनी बोरगाव पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र तेलतुंबडे यांना कारवाईबाबतच्या सुचना दिल्या.
त्यानंतर दि. 04/12/2024 रोजी सकाळी 07.00 वा. ते 14/12/2024 रोजीचे सकाळी 07 वाजण्याच्या सुमारास फत्यापुर ता. जि. सातारा येथे तक्रारदार यांचे राहते घराशेजारी मोकळ्या जागेत लावलेली ट्रैक्टरची लोखंडी फनपाळी 40 हजार रुपये किंमतीची असलेली ही अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याबाबतचा गुन्हा बोरगाव पोलीस ठाणेस दि.18/12/2024 रोजी दाखल करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने श्री रविंद्र तेलतुंबडे यांनी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना सदर गुन्हा उघडकीस आणुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच अज्ञात चोरट्यांचा शोध घेवुन कारवाईबाबतच्या सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे डीबी पथकाचे पोलीस नाईक प्रशांत चव्हाण व पोकों अतुल कणसे यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक महिन्द्रा कंपनीचा ट्रॅक्टर (क्रमांक MH11- DA-9615) हे संशयितरित्या नांदगाव ता.जि. सातारा गावाच्या आवारत वावरताना दिसल्याचे सांगितले. त्यावरुन डीबी पथकाने सदर ट्रक्टरचा शोध घेवुन त्यावरील चालकास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला म्हणुन त्यास विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता त्याने मीच सदरची फनपाळी चोरुन आणल्याचे सांगुन सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली.
त्यानंतर त्यास ताब्यात घेवुन गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त पंचनामाव्दारे हस्तगत करुन गुन्ह्यात वापरलेला एक महिन्द्रा कंपनीचा अर्जुन मॉडेलचा ट्रक्टर (क्रमांक MH11 DA 9615) असे वाहन जप्त करुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले ट्रक्टर असा एकुण 7 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.
पोलीस अधीक्षक श्री समीर शेख पोलीस व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजीव नवले यांचे सुचनेप्रमाणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रविंद्र तेलतुंबडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, पोकों अतुल कणसे, पोकों केतन जाधव यांनी सदरची कारवाई केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोहवा विजय म्हेत्रे हे करीत आहेत.