कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात वारंवार भीषण आगीच्या दुर्घटना घडत आहेत. गत महिन्यात गॅस सिलेंडरच्या गोदामास आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता गोटेवाडी येथील प्रकाश कळंत्रे यांच्या घराला भीषण आग लागून संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी आल्याने घरातील सर्व संसारपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना रविवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये प्रकाश कळंत्रे यांचे घराचे प्रचंड नुकसान झाले.
याबाबत घटनस्थाळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील गोटेवाडी येथे प्रकाश कळंत्रे राहतात. रविवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात आतील बाजूस भीषण आग लागली. घरातून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे परिसरातील ग्रामस्थांनी पाहिले असता त्यांनी तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला.
तर काही ग्रामस्थांनी ही आग विजवण्यासाठी अग्निशामक दलास फोन करून माहिती दिली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने कळंत्रे यांच्या घराला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश आले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या आगीमध्ये कोणत्याही स्वरूपाची जीवित हानी झाली नसून आगीमुळे गोटेवाडी गावावर चिंतेचे सावट पसरले आहे.