सातारा प्रतिनिधी । बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी वाई तालुक्यातील बावधन येथील पोलीस अभिलेखावरील गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून ३ गावठी पिस्टल, २ गावठी कट्टे, ७८ जिवंत काडतुसे, ३७० वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या, २ तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे, वाघाचे नख असा ६ लाख २० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल सातारा पोलिसांनी जप्त केला आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ही धडाकेबाज कारवाई केली.
अविनाश मोहन पिसाळ (रा. बावधन नाका, ता. वाई) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी जिल्ह्यातील बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमांच्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील,अमित पाटील यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष तपास पथक तयार केले.
दरम्यान, बावधन नाका येथील पोलीस अभिलेखावरील आरोपी अविनाश मोहन पिसाळ याच्याकडे बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्टल आहे तसेच त्यास शिकारीचा छंद असून त्याच्याकडे वन्यजीव प्राण्यांचे अवयवही असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्री. देवकर यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सपोनि रविंद्र भोरे व त्यांच्या पथकास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या पथकाने रविवारी वाई वनविभागाच्या अधिकारी स्नेहल मगर व त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेवून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी छापा टाकला.
यावेळी पोलीस अभिलेखावरील अविनाश पिसाळ या गुन्हेगाराकडून ३ गावठी पिस्टल, २ गावठी कट्टे, ७८ जिवंत काडतुसे, ३७० वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या, २ तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे, वाघाचे नख असा ६ लाख २० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याचे विरुध्द वाई पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम व वन्यजीव सरंक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.