कराड प्रतिनिधी | घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस मशीनच्या सहाय्याने वाहनात भरत असताना आगाशिवनगरमध्ये एकास पुरवठा विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शनिवारी पुरवठा विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक महादेव आष्टेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल शिवाजी पवार (वय 32) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील आगाशिवनगर परिसरात एका ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस मशीनच्या सहाय्याने वाहनात भरला जात असल्याची माहिती तहसीलदार यांना मिळाली. त्यांनी पुरवठा निरीक्षक आष्टेकर यांना संबंधित घटनेची खातजमा करायला सांगीतले. त्यानुसार आष्टेकर यांनी संबंधित ठिकाणी जावुन पाहणी केली. त्यावेळी त्यांना गॅस हा ज्वलनशील पदार्थ असुनही कोणतीही सुरक्षिततेची काळज न घेता सार्वजनिक मालमत्तेस व जिवीतास धोका असल्याचे माहिती असुनही घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस मशीनच्या सहाय्याने विशाल पवार हा वाहनात गॅस भरत असताना मिळुन आला.
त्यावरुन त्यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. माहिती प्राप्त होताच पोलिसांनी संबंधिताकडील सिलेंडर व गॅस भरण्याचे साहित्य जप्त केले आहे. याबाबत आष्टेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.