सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात डिटेक्टिव्ह ब्रँचच्या पथकाकडून नुकतीच मोठी कारवाई करण्यात आली आहे. येथील पसरणीमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पथकाने छापा टाकत 53 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून एक जणास ताब्यात घेतले आहे.
अशोक बजरंग पवार (रा. सिद्धनाथ वाडी, ता. वाई) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस प्रभारी अधिकारी परि सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांना पसरणी रोड येथे एक इसम मटक्याचा अड्डा चालवत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी वाई पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत शिंदे, श्रावण राठोड, अक्षय नेवसे, राहुल भोईर यांना सदर मटक्याच्या अड्ड्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर डिटेक्टिव्ह ब्रँच पथकाने सापळा रचून (अशोक बजरंग पवार रा. सिद्धनाथ वाडी, ता. वाई ) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे 53 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, वाई पोलीस ठाणे प्रभारी परी सहा पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस हवालदार राहुल भोईर, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत शिंदे, श्रावण राठोड, अक्षय नेवसे, प्रेमजीत शिर्क यांच्या पथकाने सहभाग घेतला.