कराड प्रतिनिधी । महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या शेकडो दिंड्या पंढरपूरजवळ पोहचल्या आहेत. कराड तालुक्यातील अनेक दिंड्याही पंढरपूरसमीप पोहचल्या असून, परिसरातील अनेक वारकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने या दिंड्यांमध्ये सामील झाले आहेत. या वारकऱ्यांना कृष्णा हॉस्पिटलच्या पथकाने वारी मार्गावर वैद्यकीय सेवा देत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली.
कराडसह वाळवा तालुक्यातील वारकरी श्री मच्छिंद्रनाथ महाराज दिंडी सोहळा (किल्ले मच्छिंद्रगड), श्री संत गाडगेबाबा दिंडी सोहळा (तांबवे), श्री बापू नाना कृष्णत नाना दिंडी सोहळा (तांबवे), श्री मुकुंद महाराज दिंडी सोहळा (आटके) आदी दिंड्यांमधून मोठ्या संख्येने पंढरपूरला जातात. यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कृष्णा हॉस्पिटलच्या वतीने दरवर्षी वारीच्या कालावधीत आरोग्य सेवा दिली जाते. सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेला हा आरोग्य सेवेचा उपक्रम गेली 30 वर्षे अव्याहतपणे सुरु आहे.
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही कृष्णा हॉस्पिटलच्या 25 जणांच्या वैद्यकीय पथकाने वारी मार्गावर ठिकठिकाणी आरोग्य सेवा दिली. या पथकात मेडिसीन, सर्जरी, ऑर्थोपेडिक, त्वचारोग, स्त्री रोग, दंतविकार, नेत्ररोग, फिजीओथेरपी, कान-नाक-घसा तज्ज्ञांचा समावेश होता. पळशी, माणगंगा कारखाना (आटपाडी), झरे व सुपली याठिकाणी आरोग्य तपासणी व सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करुन, वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली. यावेळी वारकऱ्यांना मोफत तपासणी व उपचारासह आवश्यक औषधेही मोफत पुरविण्यात आली.