सातारा प्रतिनिधी । शिरवळ, ता. खंडाळा येथील 2 अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांवर 15 वर्षीय शालेय विद्यार्थ्याने सत्तूरने प्राणघातक हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर 15 वर्षीय शालेय विद्यार्थ्यास शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यास काल सातारा येथील बालन्यायालयात हजर केले असता बाल सुधारगृहात ठेवण्याची शिक्षा सुनावली. त्यानंतर संबंधित हल्लेखोर विद्यार्थ्याची सातारा बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरात एका खासगी शाळेमध्ये दोन अल्पवयीन भाऊ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान, 2 ते 3 दिवसांपूर्वी शाळेमध्ये नव्याने दाखल झालेला 15 वर्षीय विद्यार्थी त्यांना त्रास देत असल्याची तक्रार संबंधित अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षकांकडे केली होती. त्यानुसार शाळेमधील शिक्षकांनी पंधरा वर्षीय विद्यार्थ्याला समज दिली होती. मात्र, चिडून जाऊन संबंधित विद्यार्थ्याने शुक्रवार, दि. 14 रोजी शाळा सुटल्यानंतर घरी निघालेल्या दोन्ही भावंडांना शिरवळमधील एका शाळेलगत असणाऱ्या चौकामध्ये अडवले अचानकपणे लोखंडी घातक शस्त्राने हल्ला केला.
यावेळी सतरा वर्षीय विद्यार्थी गंभीर तर भावाला वाचविताना चौदा वर्षीय भाऊ हा गंभीर जखमी झाला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चौदा वर्षीय विद्यार्थ्याला पुढील उपचाराकरिता पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नवनाथ मदने, पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सतीश आंदेलवार, अब्दुल बिद्री, पोलिस अंमलदार जितेंद्र शिंदे, दत्तात्रय धायगुडे, तुषार अभंग, सुजीत मेगावडे, भाऊसाहेब दिघे, दीपक पालेपवाड, संजय थोरवे यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली.
शिरवळ पोलिसांनी तत्काळ तपासचक्र फिरवित हल्लेखोर पंधरा वर्षीय विद्यार्थ्याला अवघ्या 20 मिनिटांमध्ये ताब्यात घेतले. दरम्यान, संबंधित 15 वर्षीय विद्यार्थ्याला सातारा येथील बालन्यायालयात हजर केले. यावेळी बालन्यायालयाने हल्लेखोर विद्यार्थ्याची सातारा येथील बालसुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. या घटनेची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई तपास करीत आहेत.