क्रीडा शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; घटनेमुळे साताऱ्यात खळबळ

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. शहरातील एका शाळेतील क्रीडा शिक्षकाने अल्पवयीन मुलीची छेड काढत तिचा वेळोवेळी विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे. मोबाईलमधील फोटो टेलिग्रामवर पाठव’, असे म्हटल्याने शिक्षकाविरुद्ध पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ रामचंद्र शर्मा (वय ३०, रा. मंगळवार तळे, सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, विनयभंगाची ही घटना ऑगस्टपासून वेळोवेळी घडली आहे. तक्रारीत मुलीने म्हटले आहे की, शाळेत असताना स्टाफरूममध्ये कोणी नसताना शिक्षकाने बोलावून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे म्हणत विनयभंग केला. शिक्षकाने केलेल्या या कृत्याने मुलगी घाबरली. यानंतर संशयित शाळा व मुलीच्या घरापर्यंत तिचा पाठलाग करायचा. संशयित सौरभ शर्मा याने मुलीला आईचा मोबाईलवरील फोटो टेलिग्राम या अॅपवर पाठवण्यास सांगितले. तसेच प्रेमाबाबतचे मेसेज पाठवले. या सर्व घटनेने मुलगी अधिक घाबरली. या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्यात क्रीडा शिक्षक सौरभ शर्मा याच्याविरुद्ध पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.