सातारा प्रतिनिधी | सातारा येथील एका नामवंत शिक्षण संस्थेच्या सोमवार पेठ सातारा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांस किरकोळ कारणावरून एका शिक्षिकेने वळ उठेपर्यंत गालावर हाताने मारहाण केली आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
याबाबत पालकांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, त्यांचा सात वर्षीय मुलगा हा नवीन मराठी शाळा, सातारा येथे इयत्ता २ री ब या वर्गात शिक्षण घेत आहे. शुक्रवारी (दि. ५ जानेवारी) शाळा सुटण्याच्या वेळेत मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी गेले असता, त्याच्या गालावर व्रण व वळ आढळून आले. याबाबत संबंधित पाल्यास विचारले असता, मनिषा चव्हाण यांनी छंद विषयाची माहिती वहीत लिहून पूर्ण झाली नाही, म्हणून चव्हाण यानी हाताने गालावर जोरदार चापट मारल्याचे त्याने सांगितले.
याबाबत चव्हाण यांना विचारले असता रागाच्या भरात मी तुमच्या मुलास मारले, असे सांगितले. स्वतःच्या या कृत्याबद्दल त्यांनी कोणताही खेद व्यक्त केला नाही. पालकांनी मुख्याधापक, शिस्त समिती किंवा शालेय व्यवस्थापन समितीला भेटू का? असे विचारले असता, तुम्ही कुठेही जा. मला काही फरक पडत नाही. माझे वरपर्यंत हात आहेत. माझे कोणीही काहीही बिघडवू शकत नाही, अशी उद्धट उत्तरे दिली.
दरम्यान, मनिषा चव्हाण यांच्याकडे उपमुख्याध्यापिका म्हणूनही जबाबदारी आहे. त्यांचे अध्यापनाकडे आजिबात लक्ष नसते. शालेय प्रशासन व पदाधिकारी यांच्यासमोर पुढे पुढे करण्यातच त्यांना रस असतो, असा सर्वच पालकांचा अनुभव आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना मारहाण व शारिरीक शिक्षा करू नये, या नव्या शैक्षणिक नियमांचा भंग संबंधीत शिक्षिकेकडून होत आहे.