भांडणातून शिक्षकांकडे तक्रार करणाऱ्या दोघा भावंडांना एकटं गाठून ‘त्यानं’ केला जीवघेणा हल्ला; पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शाळेत भांडणे झाल्यानंतर विद्यार्थी त्याची तक्रार शिक्षकांकडे करतात. मग शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करतात. मात्र, आपली तक्रार केल्याचा राग मनात धरून कधीकाळी तो बाहेरही काढला जातो. अशीच घटना सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एक शाळेत घडली आहे. शाळेत शिक्षकांकडे तक्रार केल्याच्या कारणातून एका शालेय विद्यार्थ्याने शाळेमधील 2 विद्यार्थ्यांवर लोखंडी घातक शस्त्राने जीवघेणा हल्ला करीत त्याला गंभीर जखमी केले आहे. जीवघेणा हल्ला करणाऱ्या शालेय अल्पवयीन विद्यार्थ्याला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरात एका खासगी शाळेमध्ये दोन भाऊ शिकतात. एक 10 वीत तर दुसरा 8 वीमध्ये शिक्षण घेत आहे. 2 ते 3 दिवसांपूर्वी शाळेमध्ये नव्याने दाखल झालेला १५ वर्षीय विद्यार्थी हा नाहक त्रास देत असल्याची तक्रार संबंधित अल्पवयीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्ग शिक्षकांकडे केली होती. त्यानंतर शाळेमधील शिक्षकांनी 15 वर्षीय विद्यार्थ्याला बोलवून घेतले. तसेच त्याच्याकडे विचारपूस करून त्याला समाज देत पुन्हा असा प्रकार करू नये असे सांगितले. मात्र, संबंधित 15 वर्षीय विद्यार्थ्याच्या मनात आपली शिक्षकाकडे तक्रार केल्याचा राग होता. त्यातून तो दोन्ही भावंडांवर चिडून होता. शुक्रवार दि. 14 जुलै रोजी तो दिवसभर कधी शाळा सुटण्याची वाट पाहत होता.

अखेर सायंकाळच्यावेळी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी शाळेतून बाहेर येऊ लागले. त्यांच्याबरोबर 15 वर्षीय विद्यार्थी व दोघे भावंडेही येऊ लागले. शाळेतून थोड्या अंतरावर गेल्यावर घरी निघालेल्या दोन्ही भावांना त्याने पाठीमागून पाठलाग करत चौकामध्ये अडविले. काही कळणार इतक्या वेळेत त्याने अचानकपणे लोखंडी घातक शस्त्राने दोघं भावंडांवर जोरदार हल्ला केला. यावेळी 17 वर्षीय विद्यार्थी गंभीर तर भावाला वाचविताना 14 वर्षीय भाऊ हा गंभीर जखमी झाला. हा प्रकार घडताना तेथील पाहिले त्यांनी तात्काळ त्या हल्लेखोर विद्यार्थ्यास अटकाव करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला पकडणार इतक्यात हल्लेखोर विद्यार्थी तेथून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 14 वर्षीय विद्यार्थ्याला नागरिकांनी उपचाराकरिता पुणे याठिकाणी खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे. यावेळी शिरवळ पोलिसांनी तात्काळ तपास करीत हल्लेखोर 15 वर्षीय विद्यार्थ्याला अवघ्या 20 मिनिटांमध्ये ताब्यात घेतले. घटनेची नोंद करण्याचे काम शिरवळ पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत सुरू होते.