गणपतीच्या आरतीला बोलवा म्हणत काही क्षणात शाळकरी मुलानं उचलल टोकाचं पाऊल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सद्या गणपती उत्सवाची धामधूम सुरू असल्यामुळे सर्वत्र तरुण मंडळांमध्ये गणपतीच्या आरतीसाठी हजेरी लावत आहेत. यामध्ये अगदी लहान बालकांपासून ते वयोवृध्द सहभागी होत आहेत. मात्र, सातारालगत असलेल्या कोंडवे गावात एक धक्कादायक घटना घडली. क्लासवरून आल्यानंतर सहावीतल्या मुलाने शेजारच्या काकूंना ‘मला गणपतीच्या आरतीला बोलवा, तोपर्यंत मी जेवण करतो,’ असं सांगून घरात गेला. तो अखेरचाच. जेवण झाल्यानंतर त्यानं किचनमध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवल. कोंडवे येथे शुक्रवार, दि. २२ रोजी घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

सुशांत नीलेश कांबळे (वय १२) असे आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुशांत हा शाहूपुरीतील एका शाळेत सहावीमध्ये शिकत होता. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता तो क्लासवरून घरी आला. त्यावेळी त्याची आई आणि वडील कामावर गेले होते. घराची एक चावी त्याच्याजवळ होती. दरवाजा उघडून तो घरात गेला. तत्पूर्वी त्याने शेजारील काकूंना ‘मला गणपतीच्या आरतीला बोलवा. तोपर्यंत मी जेवण करतो,’ असे सांगितले.

सकाळी साडेअकरापर्यंत घरात तो एकटाच जेवला. त्यानंतर त्याने किचनमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेतला. दरम्यान, बराचवेळ तो घरातून बाहेर आला नाही म्हणून त्याचे मित्र त्याला बघायला घरात गेले. त्यावेळी तो त्यांना लटकलेला दिसला. हे पाहताच मुलांनी आरडाओरड केली. काहींनी सुशांतच्या आई-वडिलांना याची माहिती दिली. सातारा तालुका पोलिस आणि त्याचे आई-वडीलही तातडीने घटनास्थळी आले. त्याच्या गळ्याचा फास काढून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

सुशांतची आई धुणीभांडीचे तर वडील गवंडी काम करत आहेत. हे दोघे रोज सकाळी घराबाहेर पडतात. नेहमीप्रमाणे सुंशातही क्लासला जात होता. घरात कसलाही वाद झाला नाही. असे असताना त्याने कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, या विचाराने त्याच्या घरातल्यांना अस्वस्थ करून सोडलं आहे. शाळेत किंवा गावात त्याची कोणासोबत भांडणे झाली होती का, त्याला कोणी रागवले का, याचा आता पोलिस तपास करत आहेत. योगेश पोपट कांबळे (वय ३७, रा. कोंडवे, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली असून, पोलिस नाईक प्रवीण वायदंडे हे अधिक तपास करीत आहेत.