सातारा प्रतिनिधी । सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ट्रॅप कॅमेऱ्यात पट्टेरी वाघ कैद झाला आहे. दि. १७ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता ट्रॅप कॅमेऱ्याने वाघाचे फोटो टिपले आहेत. ही बाब अत्यंत आशादायी असून व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांना आता अधिक सतर्क करण्यात आले आहे.
वाघाच्या पायाचे ठसे आढळले…
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील दाट जंगल भागात दि. १२ डिसेंबर रोजी पट्टेरी वाघाच्या पायाचे ठसे मिळाले. गस्तीवरील वनरक्षक आणि वनमजुरांनी वनक्षेत्रपालांना माहिती दिली. त्यानंतर पुढे तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी वाघाच्या पायांचे ठसे आणि विष्ठा सापडली.
चार दिवसांपूर्वी वाघ कॅमेऱ्यात कैद
व्याघ्र प्रकल्पाच्या दाट जंगल परिसरात वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यांच्या तपासणीत दि. १७ रोजी पहाटे ४.५९ वाजता वाघाचे फोटो कैद झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या दृष्टीने ही खूप आशादायक बाब आहे. आता प्रकल्पातील अधिकाऱ्यांना आणखी सतर्क करण्यात आले आहे.
पाचव्यांदा वाघाचे छायाचित्र कॅमेऱ्यात
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्याने २३ एप्रिल २०२२ रोजी पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपले होते. यापूर्वी २०१२, २०१८, २०२१, २०२२ आणि आता १७ डिसेंबर २०२३ रोजी पाचव्यांदा व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचे छायाचित्र कॅमेऱ्यात टिपले गेले आहे.