सातारा प्रतिनिधी | सातारा शहरापासून काही अंतरावर असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर अनेक महाकाय दगड धोकादायक स्थितीत उभे आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, हे दगड वसाहतींच्या दिशेने कोसळण्याचा धोका निर्माण होतो. दरम्यान, रविवारी दुपारी एक भला मोठा दगड किल्ल्यावरून वसाहतींच्या दिशेने कोसळला. उंचावरून आलेल्या या दगडाचा वेग जास्त असल्याने डोंगर उतारावरील 2 झाडे उन्मळून पडली. हा दगड दरीत कोसळल्याने मोठा अनर्थ टळला.
दगड दरीत कोसळल्यामुळे या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा दगड दरीत कोसळल्याने धोका टाळला असला, तरी दगडाचा वेग अधिक असल्याने, एक झाड बुंध्यासह उन्मळून पडले. तर दुसरे झाडही जमीनदोस्त झाले.
अजिंक्यतारा किल्लालगत रविवारी दुपारी पाणीपुरवठ्याचा व्हाॅल्व्ह सोडण्यासाठी सातारा पालिकेचे कर्मचारी आले होते. त्या कर्मचाऱ्यांनी हा घडलेला प्रकार पाहिला. या घटनेनंतर अजिंक्यतारा किल्ला परिसरात ट्रेकिंगसाठी जाणाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.