सातारा प्रतिनिधी । पुणे- सातारा महामार्गावरील खंबाटकी बोगदा उतरून पुण्याच्या बाजूला जाताना तीव्र उतारावरील एस-कॉर्नरवर पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या टँकरने तीन वाहनांना ठोकरले. आज सकाळी झालेल्या या अपघातात दोघे जखमी झाले असून, लॅपटॉप घेऊन निघालेला टेंपो कॅनॉलमध्ये जाऊन पडला.
या अपघातात नंदा नीलेश येवले (कारमधील प्रवासी), टेंपो चालक मोहम्मद आयुब तालिब (वय २३, रा. कोठीयायी, ता. राणीगंज, उत्तर प्रदेश) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
खंबाटकी घाट उतरताना भरधाव वेगात येणाऱ्या टँकरच्या (जीजे १२ बीटी ७o८९) चालकाचा ताबा सुटल्याने, त्याने टेंपोला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामध्ये तो धोम- बलकवडीच्या कोरड्या कॅनॉलमध्ये पडला. त्यानंतर पुढे चाललेल्या चारचाकी कारला (एमएच ११ बीके ०६३७) त्याने धडक दिली, तर पुढे रस्त्याच्या कॉँक्रिटीकरण करणाऱ्या वाहनालाही मधोमध धडकून हा टँकर जागीच थांबला. त्यानंतर टँकर चालकाने टँकर जागीच सोडून पोबारा केला. या घटनेची फिर्याद मोहम्मद तालिब याने दिली आहे.