कराड प्रतिनिधी । शरीराने स्त्रियांसारख्या दिसत असल्या तरी त्या सर्वसामान्य स्त्रीसारख्या विवाह करू शकत नाही. तर पुरुषा सारखे मेहनत करू शकत नाही. टाळ्या वाजवून पैसे मागने आणि त्या बदल्यात आशीर्वाद दिला जातो. पूर्वीच्या काळी त्यांना समाजाकडून हिणवले जात असे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. त्यांनाही समाजात मान दिला जातोय. आणि आता तर त्याच्या समस्या व तक्रारीचे निवारण करण्यासाठी शासकीय स्थरावर हेल्पलाईन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात हेल्पलाईन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात तसे पाहिले तर तृतीयपंथीयांची संख्या फारशी जास्त नाही. मात्र, तृतीयपंथीय जिल्ह्यात आहेत. समाज कल्याण विभागाकडे आतापर्यंत फक्त 55 तृतीय पंथीयांची नोंदणी करून प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे. त्यांच्यामध्ये जनजागृती होणे गरजेची आहे. सध्या समाज कल्याण विभागात या कक्षामार्फत जिल्हास्तरावर तृतीयपंथीय यांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करणे, तृतीयपंथीयांसाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्याचे काम केले जात आहे.
तृतीय पंथीयांनी तक्रार, समस्यांबाबत संपर्क साधावा : नितीन उबाळे
समाजात आज तृतीय पंथीयांना चांगले स्थान, वागणूक मिळत आहे. त्याच्यासाठी शासकीय स्थरावर अनेक योजना देखील आहे. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण कार्यालयात तृतीय पंथीयांसाठी कालच हेल्पलाईन कक्ष सुरु करण्यात आला असून त्याद्वारे तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तृतीय पंथियां पैकी कोणास तक्रार करावयाची असेल किंवा काही समस्या उध्दभवल्यास त्यांनी ०२१६२-२९८१०६ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आल्याची माहिती सातारा समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
कक्षामार्फत ‘या’ तक्रारी आणि समस्या सोडविल्या जाणार
समाजकल्याण विभागात स्थापन करण्यात आलेल्या विशेष हेल्पलाईन कक्षामार्फत तृतीयपंथीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना तसेच शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करणे व त्याबाबतच्या अडचणी सोडविणे, शिधापत्रिका, मतदान कार्ड व आधार कार्ड काढण्यासाठी मदत करणे, केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळवून देणे तसेच शासनाने व समाज कल्याण आयुक्तालयाने वेळोवेळी दिलेल्या सूचना इ. बाबींची जिल्ह्यातील तृतीयपंथी यांना सविस्तर माहिती देण्याबरोबरच त्यांच्या समस्या कक्षामार्फत सोडविण्यात येणार आहे.
पहा हेल्पलाईन कशाचा नंबर कोणता?
सातारा जिल्ह्यातील समाज कल्याण विभागात सुरु करण्यात आलेल्या हेल्पलाईन कक्षाशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक ०२१६२-२९८१०६ असा आहे. तरी जिल्ह्यातील तृतीयपंथी यांनी अडीअडचणीबाबत कक्षाशी प्रत्यक्ष किंवा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन येथील अधिकाऱ्यांनी केले आहे.