जिल्ह्यात दाखल झाली ऐतिहासिक तोफ, नेमकी कुठं आहे ‘ही’ तोफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील वाई येथे राहणारे इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर यांनी शिवकालीन शस्त्रास्त्रांचा संग्रह करण्याचा छंद जोपासला असून त्यांच्या शस्त्र संग्रहात नुकतीच एक इशारतीची तोफ दाखल झाली आहे. लांबी पाच इंच, अत्यंत सुंदर नक्षीकाम व ब्रांझ धातूपासून घडवण्यात आलेली ही तोफ 18 व्या शतकातील असल्याचे समोर आले आहे.

प्रसाद बनकर यांनी गेल्या 22 वर्षांपासून शस्त्रास्त्रांचा संग्रह व त्यांचे संवर्धन करण्याचा छंद जोपासला आहे. त्यांच्या संग्रहात शिवकालीन तलवार, भाले, बरचे, वाघनखे, बिचवा, दांडपट्टे , मराठा धोप तलवार, चिलानम, ढाल व ढालीचे विविध प्रकार, ब्रिटिशकालीन तलवारी, बंदुका, बारुददान यांसह 14 व्या आणि 15 व्या शतकातील हजारो शस्त्रे आहेत. विविध धातूपासून बनवण्यात आलेल्या देवी देवतांच्या मूर्ती, दुर्मीळ दिवे, 12 हजारांपेक्षा जास्त जुन्या नाण्यांचा संग्रह देखील त्यांनी केला आहे. त्यांच्या संग्रहात 10 ईशारतीच्या तोफा असून नुकतीच एक तोफ त्यांच्या संग्रहात दाखल झाली आहे. कोल्हापूर येथे कामानिमित्त गेले असता त्यांना एका कुटुंबाकडे ही तोफ आढळून आली. या तोफेचे महत्व जेव्हा त्या कुटुंबीयांना सांगण्यात आले तेव्हा त्यांनी ही तोफ जतनीकरणासाठी बनकर यांना देऊ केली. केवळ 5 इंच लांबीची ही तोफ त्यांच्या संग्रहातील सर्वांत लहान तोफ आहे.

इशारतीच्या तोफा 16 व्या शतकापासून 19 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत पहायला मिळतात. या तोफा त्या काळातील राजघराणे, सरदार घराणे किंवा मोठ्या व्यक्तींच्या वाड्यात, देवघराबाहेर ठेवल्या जात असत. जत्रेच्या वेळी घरातील देव पालखीमध्ये बसवून पालखी बाहेर येताना अथवा देव वाड्याबाहेर पडले आहेत, याची इशारत देण्यासाठी या तोफेमध्ये गुलाल भरुन व दारुगोळा भरुन बत्ती दिली जायची. म्हणूनच अशा तोफांना ‘इशारतीच्या तोफा’ हे नाव दिले गेले असावे, असा कयास इतिहास अभ्यासकांकडून बांधला जात आहे.