जाहीर नोटीस काढण्यासाठी धर्मादाय कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने घेतली 1 हजाराची लाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने सोमवारी सायंकाळी एक कारवाई करण्यात आली. चाैकशीची जाहीर नोटीस काढण्यासाठी एक हजाराची लाच घेताना सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्रीकृष्ण दामोदर पाथरे (वय ५६, सध्या रा. यादोगोपाळ पेठ, सातारा. मूळ रा. अमरावती) यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार या वकील असून, त्यांच्याकडील अर्जदार यांची वारसा हक्काने विश्वस्त बदलाची 2 प्रकरणे सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल आहेत. या प्रकरणाच्या चाैकशीची जाहीर नोटीस काढण्यासाठी लिपिक श्रीकृष्ण पाथरे यांनी तक्रारदार यांच्याकडे 2 प्रकरणांची मिळून प्रत्येकी 508 रुपयेप्रमाणे एक हजार रुपयाची लाचेची मागणी केली. त्यानंतर संबंधित तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली.

सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास धर्मादाय कार्यालय परिसरात लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला. यावेळी श्रीकृष्ण पाथरे यांना 1 हजाराची लाच घेताना लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

सातारा शहर पोलिस ठाण्यात पाथरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन राऊत, हवालदार गणेश ताटे, प्रशांत नलावडे, नीलेश चव्हाण, महिला पोलिस नाईक प्रियांका जाधव यांनी ही कारवाई केली.