कराड प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे नुकतेच एक विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता राज्यभरात शेतकरी बांधव व शेतकरी संघटनामधून नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला जात आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी कराड येथे प्रशासकीय कार्यालय समोर येऊन काळी गुढी उभारली. यावेळी आंदोलक व पोलिस यांच्यामध्ये झटापट झाली. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे आंदोलन कर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम साळुंखे, दादासाहेब यादव, तालुकाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे, प्रमोद जगदाळे यांच्यासह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. सकाळी अकराच्या सुमारास कार्यकर्ते, पदाधिकारी तहसील कार्यालयाबाहेर एकत्रित झाले. यावेळी प्रशासकीय कार्यालयाबाहेर आंदोलकांनी आंदोलन करू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी काळी गुढी घेऊन स्वाभिमानीचे पदाधिकारी तहसील कार्यालयासमोर आले. प्रवेशद्वारानजीक त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच काळी गुढी उभारण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीवेळी सत्ताधाऱ्यांकडून कर्जमाफी देण्याची ग्वाही दिली होती. मात्र, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नाही, असे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची भावना जिल्हा उपाध्यक्ष उत्तम साळुंखे, दादासाहेब यादव, तालुकाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे, प्रमोद जगदाळे यांनी व्यक्त केली.
त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह शासनाचा निषेध नोंदविला. त्यावेळी पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार व बंदोबस्तास असलेले पोलिस यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना काळी गुढी उभारण्यास विरोध केला. पोलिस व पदाधिकाऱ्यांत झालेल्या झटापटीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी काळी गुढीही ताब्यात घेतली.