सातारा प्रतिनिधी । परतीच्या पावसाने काढता पाय घेतल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. यंदाच्या हंगामातील पहिले दाट धुके अनुभव संपूर्ण जिल्ह्यात अनुभवायला मिळाले. सातारा जिल्ह्याचा ग्रामीण देखील शनिवारी दाट धुक्यात हरवून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. धुक्यामुळे सर्व वातावरण धूसर बनले होते.
शनिवारी पडलेल्या धुक्याने सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्तर भारतातील धुक्याचा फील आला होता. यावेळी भल्या पहाटे दिवे लावून वाहने धावत होती. यावेळी वाटा धुक्यात हरवून गेल्या तर शेतशिवारे दवबिंदूंनी ओली चिंब झाली. यावेळी सकाळी शाळेला जाणारी मुले बोचर्या थंडीने कुडकडत होती. पुणे-बंगळुरू महामार्गावर देखील प्रचंड धुके पसरले होते.
सातारा जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल; वाटा हरवल्या धुक्यात, दवबिंदूंनी शेतशिवारे झाली चिंब! pic.twitter.com/wl8owC4ZdO
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 7, 2023
महाबळेश्वर, पाचगणी, कोयना, यवतेश्वर, कास या पर्यटनस्थळांवर दाट धुक्याची दुलई होती. पाण्यावरील वाफा आणि धुक्यात कराडच्या कृष्णा-कोयनेचा प्रीतिसंगम लुप्त झाला होता. ‘वाट एक जुनी, हरवली दाट धुक्यात… लपलेले दवबिंदू कुठे चमकतात पानात’, या कवितेसारखे आल्हाददायक चित्र शनिवारी सर्वत्र पाहायला मिळत होते. दाट धुक्यामुळे सकाळी आठपर्यंत सूर्यदर्शन देखील झाले नव्हते.