सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाईतील धर्मपुरी येथील सराफपेढीमध्ये काम करत असलेल्या कारागिरांना अज्ञात चोरटयांनी कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखवून ४० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा वाई पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाई येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या सोने चांदीच्या बाजारपेठेत लक्ष्मीनारायण मार्केटमध्ये धर्मपुरी परिसरातील आपल्या दुकानात संजय आणि मृत्युंजय जयंता मयंती हे दोघे भाऊ रात्री उशिरापर्यंत सोन्याचे दागिने घडवण्याचे काम करत बसले होते. यावेळी त्या ठिकाणी दुचाकीवरुन दोघे चोरटे आले. त्यांनी या कारागिरांना पिस्तुल आणि कोयत्याचा धाक दाखवला.
अचानक पिस्तुल आणि कोयत्याचा धाक दाखवल्याने कारागीर भयभीत झाले. यानंतर सोन्याचा ऐवज घेऊन त्यांनी पोबारा केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संबंधित कारागिरांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.