सातारा प्रतिनिधी । यंदाच्या वर्षी गणेशोत्सव हा शनिवारी दि. ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. सातारा जिल्ह्यात गणेशोत्सव सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. त्यामुळे सातारा शहराबरोबरच जिल्ह्यातील कुंभार बांधवांकडून गणेशमूर्ती बनविण्यासाठी लगबग सुरू आहे. श्री गणेशाच्या आगमनाला आता अवघे १७ दिवस बाकी राहिल्याने कुंभारवाड्यात मूर्तींवर अंतिम हात फिरवण्याची लगबग सुरू झाली आहे. कुंभार बांधवांचे हात आकर्षक गणेशमूर्ती साकारण्यात गुंतले आहेत.
सातारा शहरातील मंगळवार पेठेतील शाहू कला मंदिरा नजीकच्या श्री गवई विठ्ठल मंदिरामध्ये पुणे येथील उरुळी कांचन अतिशय सुबक आणि देखण्या गणेशमूर्ती आल्या आहे. श्री बालाजी रूप, माखन चोर, दहीहंडी फोडणारा, सिंहासनावर बसलेला, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, विठ्ठल मूर्तीतील गणेश, गरुडावर, मोरा सोबत खेळताना अशा अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या गणेश मूर्ती विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस बरोबरच घरगुती पूजेसाठी शाडू मातीच्या गणेश मूर्ती येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत.
यंदा डायमंड, फेटा व धोतर रेडिमेड नेसवलेल्या गणेश मूर्तीना बाजारपेठेत मागणी वाढली असून घरगुती आणि मंडळांच्या गणेशमूतीचे कोरीव काम अंतिम टप्प्यात केले जात आहे. शहरातील मोजक्या घरांमध्ये मूर्तीचे रंगकाम सुरू असून शहरात काही ठिकाणी मूर्ती विक्रेत्यांचे स्टोल लागले आहेत.
यंदा नवनवीन संकल्पनेतील मुर्ती
यावर्षी घरगुती मूर्ती या एक फुटांपासून ते तीन फुटापर्यंत साकारण्यात आलेल्या आहेत. यंदा साधारणपणे दीड हजार ते दहा हजार, तर मंडळांच्या मूर्ती दहा हजार ते लाखापर्यंत तयार होत आहेत. शाडू मातीच्या मूर्तीची यंदा संख्या वाढली आहे. भाविकांना आकर्षित करण्यासाठी बाप्पांच्या नवनवीन संकल्पनेतील मुर्ती तयार करण्यात येतात. ऑर्डरनुसार या मूर्तीना गणेशभक्त व मंडळ कार्यकर्ते रंगकाम करून मूर्ती आकर्षक करण्यावर भर देण्यात आलेला आहे.
बालगणेशा, तांडव अवतार, शिवअवतार
गेल्या काही वर्षांत शाडूच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्तीना मागणी वाढली आहे. लालबाग, दगडूशेठ, मोरावरील गणेश, तुतारीवरील गणेश, झोपाळा गणेश, स्वामी समर्थ अवतार, चौरंग गणेश अशा फेटा, घोतर आणि डायमंड वर्क केलेल्या गणेशमूर्तीना सध्या मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तर फेटाधारी, जय मल्हार, बालगणेशा, तांडव अवतार, शिवअवतार अशा गणेश मूर्तीना बच्चे कंपनीकडून घरगुती गणेश उत्सवासाठी विशेष मागणी आहे.
राज्य शासनाकडून सार्वजनिक गणेश मंडळांसाठी मोठ्या बक्षिसांची घोषणा
सध्या बाप्पांच्या आगमनाची आबालवृद्धांना प्रतीक्षा लागली असून राज्य शासनानेही सार्वजनिक गणेश मंडळांसाठी मोठ्या बक्षिसांची घोषणा केली आहे. राज्य शासनाच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या राज्यातील प्रथम तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. दि. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरून या स्पर्धेत मंडळांना सहभागी होता येणार आहे. जिल्ह्यात गणेशोत्सव सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. विविध गणेश मंडळे उत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम करतात. अशा मंडळांच्या पंखांना बळ देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून यंदा गणेश मंडळांसाठी स्पर्धा भरविण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या [email protected] या ई-मेल आयडीवर दि. ३१ ऑगस्टपूर्वी परिपूर्ण अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.