सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात किरकोळ कारणावरून हल्ला करण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. अशीच एक हल्याची घटना साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात घडली. ‘आमच्या विरोधातील लोकांसोबत का फिरतोस?’ असा जाब विचारत रिक्षाचालक असलेल्या युवकावर पाचजणांच्या टोळीने हल्ला केला. हल्लेखोरांनी हल्ल्यात कोयता, गुप्तीसारख्या धारदार शस्त्राचा वापर केल्याने बॉम्बे रेस्टॉरंट परिसर हादरुन गेला. दरम्यान, जखमीवर उपचार सुरु असून शहर पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
गजानन युवराज जाधव, आप्पा ओव्हाळ, शुभम व अनोळखी तिघे (रा. प्रतापसिंहनगर, सातारा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संग्राम उर्फ माऊली तानाजी बोकेफोडे (वय 19, रा. संगमननगर, सातारा) या युवकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 2 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली. तक्रारदार माऊली बोकेफोडे हा रिक्षाचालक त्याच्या रिक्षामध्ये बसला होता. त्यावेळी गजानन जाधवसह त्याचे इतर साथीदार तेथे आले. संशयितांनी ‘प्रतापसिंहनगरमध्ये आमच्या विरोधातील लोकांबरोबर का फिरतोस?’ असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांनी धारदार शस्त्र काढून त्यांनी बोकेफोडेवर याला ‘जिवंत सोडायचे नाही’ असे म्हणत हल्लेखोरांनी दोन्ही हातावर, डोक्यात, पाठीवर हत्यारांनी वार केले.
यावेळी बोकेफोडे याने आरडाओरडा करत मदतीची याचना केल्यानंतर परिसरातील नागरिक जमू लागले. मग हल्लेखोर तेथून पळून गेले. यानंतर जखमी बोकाफोडे याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेने प्रतापसिंहनगरमधील धुसफूस बाहेर येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.