‘गुंडाराज हटाव, महाराष्ट्र बचाव’, साताऱ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना ट्रिपल इंजिन सरकारच्या सत्तेतील भाजपचे आमदार उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडून व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न करतात. तिथे पोलिस अधिकारी उपस्थित असताना ते बघ्याची भूमिका घेतात. हे अत्यंत खेदजनक आहे. गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी (शरद पवार गट) महिला काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे, जिल्हाध्यक्षा संजना जगदाळे, माजी अध्यक्षा समिन्द्रा जाधव यांच्यासह अन्य महिला पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. भाजपचेच आमदार सांगत असतील की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्याने गुंडाराजच असणार. म्हणजे भाजपच्या आमदारांनी हे गुंडाराज आहे, यावर शिक्कामोर्तब केले आहे. पुण्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या श्रीमुखात मारले जाते.

पोलीस यंत्रणा ही जनतेच्या सुरक्षेसाठी असते. समाजात कायदा व सुरक्षा राखण्याची जबाबदारी पोलीस खात्याची असते. पण पोलीस स्टेशनमध्ये जर गुंडाराज असेल तर ह्या सत्ताधाऱ्यांनी हा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आहे? ह्या गुंडाराजमध्ये महिला सुरक्षित नाहीत. महाराष्ट्रात स्त्रियांवरील अत्याचाराचे 49 लाख गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे ‘गुंडाराज हटाव, महाराष्ट्र बचाव’, ही आमची मागणी आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सपशेल अपयशी ठरलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.