ट्रेनी डॉक्टरच्या हत्येप्रकरणी कोरेगावात निघाला निषेध मोर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रेनी डॉक्टरसोबत अत्याचार आणि हत्या केल्यावर देशभरात निषेध आणि आंदोलने सुरु आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे शनिवारी कोरेगाव शहर आणि तालुक्यातील सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या. कोरेगावातील आंदोलनाला समाजातील सर्वच घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नगरपंचायत, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, केमिस्ट असोसिएशन यासह विविध संस्था व सामाजिक संस्थांनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला.

शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथून सकाळी ११ वाजता काळ्याफिती लावून मोर्चास सुरुवात झाली. साखळी पूल, जुना मोटर स्टॅन्डमार्गे हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

इडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. संगीता सावंत, सचिव डॉ. शीतल गोसावी, काडसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉ. अरुणाताई बर्गे, ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. प्रदीप बर्गे, डॉ. राजेंद्र गोसावी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्ष दिपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, मराठा महासंघाचे सी. आर. बर्गे, ब्राम्हण सभा कोरेगावचे श्रीकृष्ण गोसावी, ईनर व्हील क्लबच्या सौ. सुधा मोरे, सागर भुंजे ,

भाजप महिला आघाडीच्या शामल शिंदे, इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ. महेश शिंदे ,केमिस्ट असोसिएशनचे विनायक मोरे , सतीश जाधव, डॉ. परीक्षिता भोसले यांनी सांगितले की, रुग्णालये सेफ झोन घोषित करावेत. तसेच रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्था बळकट करावी. रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या ६० टक्के डॉक्टर आणि परिचारिका महिला आहेत. केंद्र सरकारने याबाबत ठोस पावले उचलावीत.

आज दिवसभर सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत, या काळात अत्यावश्यक सेवा होत्या. मात्र, रुग्णांना या आंदोलनामुळे झालेल्या त्रासाबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली.