सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. बंद्यांच्या विचारामध्ये सकारत्मक घडविण्याच्या दृष्टीने आज अनोख्या पद्धतीचा उपक्रम साताऱ्यातील कारागृहात घेण्यात आला. भारतीय सेवक संगती सातारा संस्थेच्यावतीने कारागृहातील बंद्यांसाठी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समुपदेशन व सकारात्मक विचारांकडे पाऊल टाकून गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर होण्याच्या कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कारागृहातील बंद्यांच्या मनोरंजनास देखील प्राधान्य देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास भारतीय सेवक संगतीचे अध्यक्ष कृष्णात पाटील, सुधाकर कांबळे, संजय गायकवाड, सतीश कमलाकर, देविदास पिल्ले, सचिन लोखंडे, विकास चंद्रनारायण, सचिन पोळ, अजय चव्हाण, ॲनी भोरे, नमिता भोरे, राजेश अलवा तसेच कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, राजेंद्र भापकर, सुभेदार मानसिंग बागल, हवालदार अहमद संदे, सतीश अब्दागिरे, प्रेमनाथ वाडेकर उपस्थित होते.
आज साताऱ्यातील कारागृहात पार पडलेल्या कार्यक्रमातून बंदींना दैनंदिन जीवन जगत असताना जीवनातले चांगले व वाईट अनुभव याबाबत गायक व लेखक अजय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. तर भारतीय सेवक संगतीचे अध्यक्ष कृष्णात पाटील यांनी कारागृहातील बंदींना गुन्हेगारी वृत्तीपासून दूर जाऊन समाजात आपले चांगले स्थान निर्माण करण्याबाबत माहिती दिली.