सातारा प्रतिनिधी । सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये एका बंदिवानाने कारागृहातील पोलिस शिपायाला धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. ‘मी बाहेर पिस्तूल उतरवलंय, तुला दाखवतोच तू बाहेर भेट,’ अशी त्याने धमकी दिल्याची घटना बुधवार, दि. १० जुलै रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडली. याप्रकरणी एका बंदिवानावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश शशिकांत पवार असे गुन्हा दाखल झालेल्या बंदिवानाचे नाव आहे. कारागृहातील कर्मचारी प्रेमनाथ वाडीकर (वय ३५) हे बुधवारी सायंकाळी ड्यूटीवर आले. सर्कल नंबर दोन येथे ते उभे असताना बंदिवान ऋषिकेश पवार हा त्यांच्याकडे बघून त्यांना खुन्नस देऊ लागला. प्रेमनाथ वाडीकर यांनी काही दिवसांपूर्वी बंदी ऋषिकेश पवार व पवन देवकुळे यांचा वाद सोडवला होता. याचा राग मनात धरून ‘तुझा काय संबंध मला बाहेर काढायचा. तू आमची भांडणे का सोडवलीस. तू बाहेर भेट तुला दाखवतोच. मी बाहेर पिस्तूल उतरवले आहे,’ असे म्हणून त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर ‘तुला आता जिवंत सोडणार नाही’ अशी त्याने धमकी दिली.
या प्रकारानंतर प्रेमनाथ वाडीकर यांनी हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. त्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात रात्री आठ वाजता तक्रार दिली. पोलिसांनी बंदिवान ऋषिकेश पवार याच्यावर भारतीय न्याय संहिता १३२, ३५२, ३५१ प्रमाणे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. हवालदार यादव हे अधिक तपास करत आहेत.