Karad News : ‘काही दिवस थांबा, सगळं शांत झाल्यावर तुमचं काम होईल’; पोलिसांचा संशयितांना ‘प्रशंसनीय’ सल्ला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव घाटात झालेल्या लूटमारीच्या गुन्ह्यात ज्या मालाची लूट झाली. नेमके तेच दडवून भलताच मुद्देमाल चोरीला गेल्याचं समोर आणण्याची चतुराई उंब्रज पोलिसांनी दाखवलीय. तरी देखील ‘प्रशंसनीय’ कामगिरी केल्याचं सर्टिफिकेट वरिष्ठांनी देऊन टाकल्यामुळे सगळेच या प्रशंसनीय कामात वाटेकरी होऊ पाहत असल्याचे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, ‘हॅलो महाराष्ट्र’ने प्रसिध्द केलेल्या वृत्तामुळे पोलीस दलात खळबळ उडाली. सध्या या गुन्ह्यात दोघांना वाचविण्याचा प्रयत्न सुरूच आहे. ‘काही दिवस थांबा, संगळं शांत झाल्यावर तुमचं काम होईल,’ असा ‘प्रशंसनीय’ सल्ला संशयितांना देण्यात आल्याची माहिती ‘हॅलो महाराष्ट्र’च्या हाती लागली आहे.

पोलिसांच्या प्रेसनोटमधील माहिती अशी, शामगाव घाटात दि. 9 सप्टेंबरच्या रात्री दीडच्या सुमारास महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीला पोलो कार आडवी मारून संशयितांनी फिर्यादी अमिन वडगावकर यांना जबरदस्तीने गाडीत बसवून शेतात नेले. मारहाण करून पिकअप गाडी, सोन्याची चेन, रोख रक्कम, आयफोन, असा 7 लाख 17 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेल्याचा गुन्हा उंब्रज पोलीस ठाण्यात नोंद झाला.

याप्रकरणी पोलिसांनी बबलू रमेश सुर्यवंशी, यश अजित कांबळे, महेश रामचंद्र आवळे (रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर), अनुश चिंतामणी पाटील, वैभव रविंद्र पावस्कर (रा. सातारा) यांना 24 सप्टेंबर रोजी अटक करून त्यांच्याकडून 6 लाख रूपये किंमतीची चारचाकी गाडी, 30 हजार रूपयांचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली पोलो गाडी, असा मुद्देमाल हस्तगत केला. काही अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी प्रेसनोट काढून दिली आहे.

चोरीस गेलेल्या मुद्देमालात गुटख्याचा उल्लेख

याप्रकरणात उंब्रज पोलिसांनी संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यासंदर्भातील रिमांड यादीत चोरीस गेलेल्या मुद्देमालाच्या वर्णनात सर्वात शेवटी विमल पानमसाला (विमल गुटखा) असे नमूद केले आहे. मात्र, त्याचे वर्णन आणि किंमत नमूद केलेली नाही. नेमकं याठिकाणीच फसगत झाली आहे. ‘हॅलो महाराष्ट्र’च्या हाती आलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात खरी चोरी ही गुटख्याचीच झाली आहे. त्यासाठीच ही लूटमार झालेली आहे. परंतु, पोलिसांनी या गुन्ह्याचा रोखच बदलून टाकण्याची चतुराई दाखवली आहे.

लाखो रूपयांचा गुटखा गेला कुठं?

शामगाव घाटातील लूटमारीत चोरीला गेलेला गुटखा पोलिसांना अद्याप जप्त करता का आलेला नाही? बाकीचा मुद्देमाल सापडला मग गुटख्याला पाय फुटले का? वास्तविक लाखो रूपयांचा गुटखा न दाखवता हा माल आणि दोन संशयितांना वाचविण्याच्या प्रयत्नात सगळा मामला कागदावरच रफादफा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न स्पष्टपणे दिसत आहे. तरीही जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उंब्रज पोलिसांना ‘प्रशंसनीय’ कामगिरीचे सर्टिफिकेट देत असल्याने यात कोण कोण वाटेकरी आहेत, याचीही खुमासदार चर्चा उंब्रज, मसूर परिसरात सुरू झाली आहे.

गुटख्याचे दक्षिण मांड कनेक्शन

लूटमारीनंतर बोलेरो पिकअपमधील लाखो रूपयांचा गुटखा त्याच गाडीतून दक्षिण मांड खोर्‍यातील एका गावात नेऊन ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी काही संशयितांना पकडल्यानंतर बाकीच्या संशयितांनी तो गुटखा दुसरीकडे हलवल्याची चर्चा आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक झाली असली तरी दोन जणांना वाचविण्यासाठी उंब्रज पोलीस जीव तोड प्रयत्न करत आहेत.

महासंचालकांनी पोलीस पदकच द्यायला हवे

लूटमारीच्या गुन्ह्याचा तपास करताना चोरीचा मूळ उद्देश, मुख्य मुद्देमाल दडवून संशयितांना वाचविण्याची चतुराई दाखविल्याबद्दल पोलीस महासंचालकांनी खरे तर उंब्रज, मसूर पोलिसांना ‘पदक’ जाहीर करायला हवे. एकेकाळी गाजलेल्या ‘सामना’ या मराठी चित्रपटातील मारूती कांबळेप्रमाणे शामगाव घाटात लुटलेल्या गुटख्याचं ‘रहस्य’ कायम ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. या सगळ्याचा निर्माता, पटकथाकार आणि दिग्दर्शक कोण, याचा शोध आता विशेष पोलीस महानिरीक्षकांनीच घ्यायला हवा.