मांढरदेव यात्रेसाठी सर्व यंत्रणांनी नियोजनसह अंमलबजावणीत समन्वय ठेवावा : न्या.जोशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळूबाई देवीची यात्रा अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे व अत्यंत उत्कृष्ट समन्वय ठेवावा, असे निर्देश प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्ही.आर.जोशी यांनी दिले.

यावर्षी यात्रा २४ व २५ जानेवारी रोजी होत आहे. २५ जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रेनिमित्त करण्यात येत असलेल्या पूर्व तयारी व नियोजनाची आढावा बैठक सातारा जिल्हा न्यायालयामध्ये रामशास्त्री सभागृहात प्रमुख जिल्हा न्यायाधीश सातारा तथा मुख्य प्रशासक मांढरदेव देवस्थान न्या जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि वाईचे सत्र न्या एस.जी. नंदिमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार जाधव, तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी देवस्थानचे विश्वस्त यांची उपस्थिती होती.

यावेळी न्या. जोशी म्हणाले, मांढरदेव यात्रेला सांस्कृतिक महत्त्व आहे लाखो भाविक यात्रेनिमित्त येणारे लाखो भावी केंद्रस्थानी धरून यात्रेचे नियोजन करावे लागते. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजन व अंमलबजावणीत आपण कुठेही कमी पडणार नाही. यासाठी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

या बैठकीत रुग्णवाहिका, पुरेसा औषधसाठा, पाणी नमुने तपासणी, शुद्धीकरण, आपत्ती व्यवस्थापन, खाजगी वाहनांसाठी पार्किंग, संवाद यंत्रणा, विद्युत पुरवठा, सुरळीत वाहतुकीचे नियोजन, आपत्कालीन कक्ष, पशुसंवर्धन विभागाकडील कार्य, रस्ते, स्वच्छता, कायदा व सुव्यवस्थेसाठी नियोजन, अग्निशमन दलाची व्यवस्था, आदी सर्व बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला.