कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यात सध्या वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान कराड तालुक्यातील शेणोली रेल्वे स्टेशनजवळील संजयनगर-गोपाळनगर येथे शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घोरपडीची शिकार करून पार्टी केल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर वनविभाग विभागाने संबंधित शिकारीवर कारवाई करत त्यास बेड्या ठोकल्या.
सुनील विजय जाधव ( रा. गोपाळनगर-शेणोली, ता. कराड) असे वन विभागाकडून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड येथील मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे यांना काल शनिवारी सायंकाळी शेणोली रेल्वे स्टेशनजवळील संजयनगर-गोपाळनगर येथे एका घोरपडीची शिकार केल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर भाटे यांनी तात्काळ वनक्षेत्रपाल तुषार नवले यांच्याशी संपर्क साधला. त्यांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली. त्यानंतर वनक्षेत्रपाल तुषार नवले यांच्यासह रोहन भाटे, वनपाल आनंद जगताप, वनरक्षक कैलास सानप, शंकर राठोड, मानसी निकम, पुजा परुले, वाहन चालक योगेश बडेकर, वनसेवक भरत पवार, अमोल माने यांच्या पथकाने शेणोली रेल्वे स्टेशन येथे रात्री शिकार करणाऱ्या सुनील जाधव यांच्या घरी धाड टाकली.
तसेच त्याच्यावर कारवाई करीत त्यास ताब्यात घेतले.यांना दिली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने घोरपड या वन्यप्राण्याची शिकार केली असल्याचे तसेच घोरपड स्वतःच्या घरी आणून खाल्याचे कबूल केले. आरोपीने कबुली जबाब दिल्यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली आहे. घोरपड हे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत शेडुल १ भाग १ मध्ये येते. त्याची शिकार करणे, हाताळणे कायद्याने प्रतिबंधित आहे. त्यासाठी ७ वर्षांपर्यंत कारावास व दहा हजार रुपयांपर्यंत दंड अशी कायद्यात तरतूद आहे.