कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत दुभाजकाच्या झाडीतून घाईगडबडीत महामार्ग ओलांडताना भरधाव एसटीची धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना नुकतीच घडली. सोमवारी दुपारी पावनेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. बंटीराज बल्लाळ (रा. तांबवे, ता. वाळवा) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
अपघातस्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंटीराज बल्लाळ हा काही कामानिमित्त गोटे गावच्या हद्दीत आला होता. सोमवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत हॉटेल सेफ्रोन समोर तो कोल्हापूर-पुणे लेनवरून महामार्ग ओलांडत पूर्वेकडे जात होता. गडबडीत दुभाजकातील झाडीमधून तो पुणे-कोल्हापूर लेनवर गेला असता परेल ते कवठेमहांकाळ एसटी (एमएच डीटी ३९५७) ची बल्लाळ याला धडक बसली.
या धडकेत बल्लाळ हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच जवळच वास्तव्यास असलेले डीपी जैनचे कर्मचारी दस्तगीर आगा घाटनास्थळी धावले. त्यांनी एसटी महामंडळ व महामार्ग देखभाल विभागासह पोलिसांना माहिती दिली. कहऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदाळे यांच्यासह हवालदार हेमंत महाले तत्काळ अपघास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने जखमीला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता तो मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.