रात्रीत लांडग्याच्या टोळीचा 15 शेळ्या मेंढरांवर हल्ला; ‘या’ गावात घडली घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । लांडग्याच्या टोळीने एकत्रितपणे सुमारे १५ शेळ्या मेंढरांवर हल्ला केल्याची घटना म्हसवड येथील शिंदे वस्ती येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सुमारे १५ शेळ्या आणि मेंढरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटनास्थळाचा अधिकाऱ्यांकडून पंचनामा करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसवड येथील विरकरवाडी नजिक शिंदे वस्ती आहे.या वस्तीवर धनाजी शिंदे यांनी त्यांच्या राहत्या घरानजिकच काल सायंकाळी बंदिस्त जाळीदार लोखंडी पट्यांच्या पांगरीत नेहमीप्रमाणेच 12 मेंढ्या व तीन शेळ्या सुरक्षित कोंडून ठेवल्या होत्या. काल रात्री रिमझिम पावसाने सुरुवात केली व त्यानंतर वीजपुरवठाही खंडीत झाल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले. याच संधीचा फायदा घेऊन तीन लांडग्यानी या बंदीस्थ पांगरीत खालुन प्रवेश करुन त्यामधील एका पाठोपाठ अशा 12 मेंढ्या व तीन शेळ्या ठार करुन त्यांचा फडशा पाडला.

एकाचवेळी तब्बल 12 मेंढरे व तीन शेळ्या लांडग्यांना ठार करण्याची हि या परिसरातील घटना पहिलीच आहे. या घटनेची पुसटशी देखील कल्पना घरात झोपी गेलेल्या धनाजी शिंदे यांच्यासह त्यांच्या घरालगत असलेल्या इतर कुटुंबानाही आली नाही. आज सकाळी धनाजी शिंदे हे घराबाहेर आले असता त्यांना जागोजागी मेंढरे व शेळ्या जागोजागी फाडलेल्या मृत अवस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले.

या घटनेनंतर त्यांनी परिसरात पाहणी केली असता या घटनास्थळाच्या लगतच्या शेतात तीन लांडगे पुन्हा या मृत शेळ्या – मेंढ्याकडे येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी शेजारी राहत असलेल्या इतर कुटुंबाना बोलावून घेतले व सर्वांनी मिळून या लांडग्याच्या टोळीस दूर पळवून लावण्यात यश मिळविले.

धनाजी शिंदे यांची अल्पशी शेती असुन त्यांनी शेळ्या मेंढ्या पालनावर आपल्या कुटुंबाचा निर्वाह करीत आहेत. लांडग्याच्या टोळीने त्यांच्या सर्वच शेळ्या-मेंढ्या जागीच ठार केल्यामुळे त्यांचे सुमारे दीड लाखाचे नुकसान तर झालेच याबरोबर कुटुंबाच्या खर्चाचा आधारही संपुष्ठात आला. या घटनेची माहिती मिळताच स्थळी म्हसवड येथील वनरक्षक मनिषा केंद्रे , म्हसवड महसुल मंडल निरीक्षक ऊत्तम अखडमल, येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रमोद गावडे यांनी भेट दिली व झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले.