सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या भटक्या श्वानांच्या टोळक्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. रात्रीच्यावेळी त्यांच्याकडून दुचाकीस्वारांवर हल्ले केले जात आहेत. दरम्यान, येथील विसावा नाका येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेवर भटक्या श्वानांच्या टोळक्यांनी हल्ला केल्याची घटना बुधवारी घडली. श्वानांना हुसकावून लावताना रस्त्यावर आदळल्याने त्यांना दुखापतही झाली. परिसरातील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अस्मिता कुलकर्णी (वय 65, रा. विसावा नाका, सातारा) या बुधवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घराच्या दिशेने चालत निघाल्या होत्या. यावेळी रस्त्यावर कोणीही नव्हते. काही अंतर पुढे गेल्यानंतर एकापाठोपाठ एक सात ते आठ श्वानांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हातातील बॅगेने श्वानांना हुसकावण्याचा प्रयत्न करीत असताना त्या रस्त्यावर आदळल्या. यामध्ये त्यांना दुखापतही झाली.
यावेळी त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दगड, वीटांचे तुकडे श्वानांच्या दिशेने भिरकावून त्यांना हुसकावून लावले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून, पालिकेने भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी अस्मिता कुलकर्णी यांनी केली आहे.